शहरातील तीन मतदारसंघांपैकी मध्य मतदार संघावर सर्वच राजकीय पक्षांची बारीक नजर आहे. या मतदारसंघात घडणेार्या घडामोडी जिल्हाभर प्रभाव टाकणार्या आहेत. एमआयएमच्या प्रवेशानंतर मध्य मतदार संघ प्रकाश झोतात आला. गेली पाच वर्ष या मतदारसंघात धक धक कायम आहे. शहराचे हार्ट म्हणून गणला जात असलेला हा मतदारसंघ पुन्हा एकदा प्रकाश झोतात आला. ज्या मतदारसंघाने इतिहास घडवला तेथे नो एमआयएमचे बोर्ड झळकले. त्यामुळे आता ‘आ अब लौट चले...!’ या विचारावर तर मतदार आला नाही ना, असा सवाल उपस्थित होत आहे. बिनतोड सवाल करीत निरुत्तर करणारे जेवढे या पक्षाचे मतदार आहेत तेवढे या पक्षाला विरोध करणारेही कट्टरच आहेत. गेली सत्तर वर्ष प्रमुख राजकीय पक्षांनी मुस्लिम समाजाचा वापर केला असे मानणारे एमआयएमचे समर्थन करतात. तर एमआयएममुळे भाजप-सेनेचा फायदा होतो, असे म्हणत प्रखर विरोध करणारेही आहेत. अशा प्रकारच्या राजकीय द्वंद्वात नवमतदार गोंधळून गेले आहेत. काही महिन्यांपूर्वी दलित-मुस्लीम ऐक्याची हाक देत वंचित आघाडीचा नवा प्रयोग राज्यात राजकीय खळबळ उडवून देणारा ठरला. औरंगाबादेत झालेली वंचित आघाडीची सभा रेकॉर्ड ब्रेक ठरली. यामुळे काँग्रेस -राष्ट्रवादीच्या गोटात चिंता व्यक्त होत असताना भाजप-सेनेत मध्ये फीलगुड आहे. गेल्या महिनाभरापासून मुस्लिम -दलित समाजात वैचारिक मंथन होत असल्याचे दिसते. जुने जाणते आणि सामाजिक-राजकीय जाणकारांनी बैठकांचे सत्र सुरू केले. निवडणुकीपूर्वी एखाद्या ठाम मतावर समाजाला एकत्र करण्याचे उद्दिष्ट या लोकांचे आहे. विशेषतः मध्य मतदारसंघात असा प्रयोग हळूहळू जोर धरू लागला आहे. काही बिनतोड युक्तिवाद मतदारांना प्रभावित करीत आहेत. या युक्तिवादाची एक पायरी म्हणजे मोदी की राहुल गांधी? काही समाजधुरिण मोदींना हरविण्यासाठी केवळ गांधी हाच सक्षम पर्याय असल्याचे ठामपणे सांगतात. मोदींना मतदान करा असे सांगून भाजप केंद्रात सत्ता मिळवण्याचे स्वप्न बघत असेल तर प्रादेशिक पक्षांऐवजी दलित मुस्लिम समाजाला काँग्रेस हाच पर्याय अधिक फायदेशीर आहे, हा विचार गळी उतरवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. भाजप-सेना जर मोदींसाठी मते मागू शकते तर काँग्रेस राहुल गांधीसाठी का मत मागू शकत नाही? अखेर देशाला पंतप्रधान निवडण्यासाठी लोकसभेची निवडणूक होत आहे. प्रादेशिक पक्षाला मर्यादा आहेत. त्यामुळे गांधींना पंतप्रधान करण्यासाठी काँग्रेसला मतदान करावे, असा मतप्रवाह या मतदारसंघात वाहतो आहे. त्याचा परिपाक म्हणून कालच्या ‘नो एमआयएम’ या बोर्डाकडे पाहावे लागेल. मध्य मतदार संघात अशी सुप्त लाट आली तर काँग्रेसला फायदा होऊ शकतो. त्याच प्रयत्नात काँग्रेसचे नेते आहेत. दलित-मुस्लिम समाजाचे जेवढे मतदान काँग्रेसला होईल तेवढा विजयाचा मार्ग सुकर हे सरळ गणित आहे ! म्हणूनच या मतदारसंघात प्रयोगावर प्रयोग होत आहेत. ‘आ अब लौट चले...!’ म्हणत
मतदार पुन्हा काँग्रेसकडे वळला तर नवल वाटायला नको!